भाजपने आपल्याच उपाध्यक्षाला केले पायउतार

0
20

मोहाडी- नगरपंचायतीचे भाजपचे उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्या विरोधात आणलेला अविश्‍वास प्रस्ताव १२ विरुद्ध 0५ मताने पारित करण्यात आला. अविश्‍वास प्रस्ताव आणणारेही भाजपचेच नगरसेवक आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.
नगरपंचायत मोहाडीच्या सभागृहात विशेष सभा ठेवण्यात आली होती. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने असणारे नगरसेवक देवदर्शनाला गेले होते. ते ठीक १२ वाजता मिनी बसने सभागृहासमोर अचानक अवतरले. क्षणाचाही विलंब न करता सभागृहात पोहचले. विपरीत घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने भाजपच्या अध्यक्षा छाया डेकाटे, ज्योतिष नंदनवार, दिशा निमकर, सविता साठवणे, राष्ट्रवादीचे वंदना पराते, रेखा हेडाऊ, सचिन गायधने, पवन चव्हाण, मनीषा गायधने, सुमन मेहर व कांग्रेसचे महेश निमजे, देवश्री शहारे यांनी मतदान केले. तर विरोधात भाजपचेच यादोराव कुंभारे, शैलेश गभने, हेमंत पराते, पूनम धकाते, अश्‍विनी डेकाटे यांनी मतदान केले.
अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने १२ नगरसेवक असल्याने प्रस्ताव मंजूर होऊन उपाध्यक्ष शैलेश गभने यांना पायउतार व्हावे लागले. परंतु या घडामोडीमुळे नगरपंचायतीच्या पुढील राजकारणात मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या प्रस्तावाच्या विरोधात शैलेश गभने हे उच्च न्यायालयात जाणार आहेत. दिवसभर शहरात याच प्रकरणाची चर्चा होत होती.