‘जेएनयू’चे पडसाद फर्ग्युसनमध्ये !

0
16

पुणे –  सुमारे महिनाभरापासून अधिक काळ चर्चेत असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाचे पडसाद आज (मंगळवारी) पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातही उमटल्याचे पाहायला मिळाले. तरुणांचे दोन गट सामोरासामोर येऊन परस्पर विरोधी घोषणांबाजीमुळे सुमारे दोन तास महाविद्यालयीन वातावरण तणावपूरर्ण बनले होते.

जेएनयूमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) अध्यक्ष आलोक सिंग हा सोमवारपासून पुण्यात आला. त्याने  ‘जेएनयू मध्ये नक्की काय घडले‘ या संदर्भात ‘खरी‘ माहिती देण्याच्या नावाखाली ‘ तो पुण्यातील विविध संस्थांना भेटी देत आहे. तो त्याच्या काही साथीदारांसह फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘किमया‘ या खुल्या मंचावर आला होता.

या ठिकाणी जमलेल्या साधारण शंभर-सव्वाशे विद्यार्थ्यांपुढे त्याचे भाषण सुरू होते. एवढ्यात स्वतःला फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील म्हणून सांगणाऱया  काही तरुणांनी  आलोकला व हा कार्यक्रम घेणाऱ्यांना हटकले. 
एकिकडे वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा अभाविप तर्फे दिल्या जात होत्या. तर दुसऱ्या बाजूने भारतीय संविधानाचा दाखला देणाऱ्या आणि कन्हैय्या कुमारला पाठिंबा देणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. वातावरणात तणाव निर्माण झाल्याने महाविद्यालयात पोलीस आले व त्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही घोषणाबाजी आणि वाद सुरूच राहिल्यावर पोलिसांनी दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर काढले. महाविद्यालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
परवानगी नसतानाही घेतला कार्यक्रम !

आलोक सिंग याचा कार्यक्रम घेण्याविषयी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून पूर्वपरवानगी मागण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने ती नाकारली होती. तरीही अभाविपतर्फे ‘अनौपचारिक‘ कार्यक्रम असल्याचे कारण देत परवानगी नसतानाही हा कार्यक्रम घेण्यात आला. याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी म्हणाले, ” आम्ही या कार्यक्रमाची परवानगी आगोदरच नाकारली होती. तरीही हा कार्यक्रम कसा घेण्यात आला, याबद्दल चौकशी करण्यात येईल. मी ही घटना घडली, त्यावेळी महाविद्यालयात नव्हतो. मात्र, याबद्दल कळताच येथे आलो.