महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा

0
32
मुंबई – वेगळ्या मराठवाड्याच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी झाली. यावरून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज (मंगळवार) राज्यपाल सी. विद्यासागार राव यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अणे यांनी राजीनामा दिल्याचे विधानसभेत निवदेनात स्पष्ट केले.
 
अणे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी अणे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. पण विरोधी पक्षाने अणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली.  बाहेर शिवसेनेने सरकार विरोधात असहकाराची हाक देत राजीनाम्याने विषय संपणार नाही,तर अणे यांच्यावर राजद्रोह दाखल करण्याविषयी पवित्रा घेत सरकारची कोंडी केली.
मराठवाडा स्वतंत्र करा या वक्तव्याचे संतप्त पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले होते. अणे यांची पदावरून तातडीने हकालपट्टी करा, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेनेही केली होती. शिवसेनेने राजीनाम्याबरोबरच त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याने विधानसभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली होती. अखेर आज सकाळी श्रीहरी अणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.