मोहाडीत पंचायत समितीची आमसभा रंगली

0
24

मोहाडी : रेती उत्खनन, पाणी टंचाई, रोहयो यासह विविध विषयांना घेऊन पंचायत समिती मोहाडीची आमसभा चांगलीच रंगली.  आमसभेत उपस्थित झालेले मुद्दे व ठराव यांच्यावर कशाप्रकारे कारवाईकरण्यात येते हा तर काळच सांगेल. मात्र आमसभेचे सदस्य व सरपंच समाधानी दिसले. ही आमसभा लवकर बोलविण्याचे कारण विषद करतांना आमदार चरण वाघमारे यांनी अधिवेशन काळात ही आमसभा ठेवण्याचा उद्देश हा की तालुक्याच्या उपस्थित होणार्‍या समस्या शासनापुढे ठेवण्यासाठी मदत होईल. या आमसभेच्या माध्यमातुन शासनापर्यंत आवाज पोहचु शकेल, असे प्रतिपादन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरज कुमार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव तुमसरे, सभापती हरिश्‍चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे, तहसिलदार जयंत पोहणकर, जि.प. सदस्य चंदु पिलारे, शामराव कारेमोरे, जगदीश उके, निता झंझाड, निशा कळंबे, विशाखा बांडेबुचे, किरण भैरम, पुष्पा भुरे, अश्‍वनिता लेदे, राणी ढेंगे, महादेव बुरडे, भाग्यश्री चामट उपस्थित होते. 
आमसभेत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, पंचायत विभाग, रोजगार हमी योजना, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, विद्युत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वनविभाग, महसूल विभाग तसेच वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चाकरण्यात आली. चर्चेदरम्यान प्रश्नांचा भडीमार केला जात होता. आमसभेत सर्वाधिक चर्चारोजगार हमी योजनावर झाली. पाणी टचांईवर अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सर्वसमस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार वाघमारे यांनी दिले. 
प्रास्ताविक गटविकास अधिकारी लांजेवार यांनी केले. संचालन आरोग्य विस्तार अधिकारी आडे यांनी केले.

मोहाडी पंचायत समिती आमसभेच्या इतिहासात प्रथमच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दुपारी एक वाजता आमसभेत उपस्थीत होवून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. या आमसभेत सायंकाळी पाच वाजतापर्यंत थांबून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. आमसभेला मुख्य कार्यपालन अधिकारी किंवा उपमुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र तेच अनुपस्थित होते.  देव्हाडा खुर्द शाळेतील एक शिक्षीका मागील आठ वर्षापासून अनुपस्थित आहे. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. आठ वर्षापासून विभागीय चौकशी सुरु आहे. या शाळेत त्यांची पदस्थापना असल्यामुळे त्या ठिकाणी दुसरे शिक्षक दिले जाऊ शकत नाही.  यावर त्या शिक्षीकेवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
बोलण्याची परवानगी कुणाला?