फोटोसेशनसाठी सोमय्यांचा ड्रामा

0
12
नाशिक –  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या “भुजबळ फार्म‘ येथील बंगल्याला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदार किरीट सोमय्या यांनी “भुजबळ फार्म‘ या फलकासमोर उभे राहून फक्त फोटोसेशन केले आणि ते आल्या पावली माघारी फिरले.  मात्र, त्यांच्या या ड्राम्यावर भाजपमध्येच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सोमय्या हे नाशकात येणार आणि चिटफंट गैरव्यवहारप्रकरणी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेऊन चर्चा करणार आणि त्यानंतर सिडकोतील “भुजबळ फार्म‘ला भेट देणार, अशी पोस्ट कालपासूनच (ता. 24) व्हॉट्‌सऍपवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फिरविली गेली. मात्र, या संदर्भातील कोणतीही माहिती भाजप कार्यालयाकडे नव्हती. ठरल्याप्रमाणे पोलिस आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर सोमय्या यांचा ताफा “भुजबळ फार्म‘कडे निघाला. 
 
मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस-रोडवरच सोमय्यांचा ताफा रोखण्यात आला. त्यानंतर सोमय्या व भाजप कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या “भुजबळ फार्म‘ या फलकासमोर उभे राहत उपस्थित छायाचित्रकारांकडून फोटोसेशन करून घेतले. ज्याप्रकारे त्यांनी या वेळी छायाचित्रकारांना “पोज‘ दिल्या, त्यावरून ते “भुजबळ फार्म‘ पाहण्याऐवजी केवळ प्रसिद्धीचा फार्स करण्यासाठीच आले होते, हेच स्पष्ट झाले. सोमय्या यांनी फार्मकडे जाण्याचाही प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांनाही त्यांना अडविण्याची गरज भासली नाही. उल्लेखनीय म्हणजे राज्यभर भुजबळ प्रकरण गाजत असताना याचे श्रेय लाटू पाहणारे व सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत असलेले सोमय्या नाशकात आलेले असताना शहरातील तीनही आमदारांनी त्यांच्या या दौऱ्याकडे साफ पाठ फिरविली. किरकोळ दोन-चार कार्यकर्त्यांची उपस्थिती अचंबित करणारी होती.