जेटलींची साथ सोडा- केजरीवाल

0
7

नवी दिल्ली – सराफ व्यावसायिकांच्या लढ्याला समर्थन देत आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सराफ व्यावसायिकांचा पाठिंबा गमावण्याची इच्छा नसेल, तर अर्थमंत्री अरुण जेटली यांची साथ सोडून द्या, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 

दागिन्यांवरील उत्पादन शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी 2 मार्चपासून येथील जंतरमंतरवर संप सुरू केला आहे. या वेळी मोदींना उद्देशून बोलताना केजरीवाल म्हणाले, की 2012मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातही उत्पादन शुल्काला विरोध करण्यात आला होता, त्याच आधारावर सराफ व्यावसायिकांनी मतदान केले होते. आता तुम्ही स्वतः उत्पादन शुल्क आकारत आहात, तर सोनिया गांधी आणि तुमच्यात फरक काय?

जेटली हे मते मिळविणार नाहीत किंवा कोणतीही निवडणूक लढणार नाहीत, त्यामुळे ते अशा प्रकारचे निर्णय घेऊन तुम्हाला अडचणीत आणत आहेत. तुम्हाला मतांची गरज आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. त्यामुळे त्यांची साथ सोडून द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी मोदींना केले. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे सरकारला कर मिळणार नाही, उलट या व्यवसायातही इन्स्पेक्‍टर राजला चालना मिळेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.