भय्याजी जोशींवर कार्यवाही करा-कॉंग्रेस

0
8

नवी दिल्ली – भगवा ध्वज आणि वंदे मातरम या मुद्यांचा वाद उरकून काढणारे आरएसएसचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यांया विरोधात कॉंग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांचेवर सरकारने कार्यवाही करण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे. 

“भारत माता की जय‘ या मुद्‌द्‌यावर आधीच राजकारण तापले असताना संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नव्या वादाला तोंड फोडले. “भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज मानणे चूक ठरणार नाही; तसेच वंदे मातरम हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रगीत असायला हवे. वंदे मातरम म्हटल्याने उत्पन्न होणारा भाव हा “जन गण मन‘तून येत नाही,‘ असे जोशी यांनी म्हटले होते. त्यावर कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी हा प्रकार म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. “”सत्ताधारी भाजप आणि पितृ संघटना संघाने सुनियोजित विभाजनवादी मोहिमेनुसार गेल्या 23 महिन्यांपासून राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान चालवला आहे. भय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वजाचा जाहीरपणे केलेला अपमान पाहता स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाकारण्याचे संघाचे प्रयत्न स्पष्ट दिसतात. पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनीही तिरंगा ध्वज नाकारला होता,‘‘ असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

 1971 च्या राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार भय्याजी जोशी यांच्याविरुद्ध भाजपने कारवाई करावी, असे आवाहन कॉंग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी केले.