मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य केंद्राच्या मते अनधिकृत

0
9
नवी दिल्ली :  केंद्र सरकारने स्वपक्षाच्याच एका मुख्यमंत्र्याचे “भारत माता की जय‘च्या वादातील ताजे वक्तव्य “अधिकृत‘ नसल्याचे म्हटले आहे. हे मुख्यमंत्री दुसरे-तिसरे कोणी नसून  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस व रामदेवबाबा यांनी या वादात केलेली वक्तव्ये केंद्र सरकारच्या दृष्टीने “अधिकृत‘ नसल्याचे म्हणजेच ते अनधिकृत असल्याचे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी आज स्पष्टपणे सांगितले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपची सरकारे उत्तम काम करत असल्याचा निर्वाळा देत असतानाच नायडू यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य चक्क अनधिकृत ठरविल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. फडणवीस यांनी “भारत माता की जय‘बाबत नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत नायडूंना विचारले असता त्यांनी, “या मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही ठराव मंजूर केला आहे का?‘ असा प्रतिप्रश्‍न केला. मात्र देशाच्या नागरिकांना ही घोषणा देण्याची सक्ती करणारा कोणताही निर्देश सरकारने जारी केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांना, संघनेते भैयाजी जोशी, रामदेवबाबा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता नायडू यांनी, त्यांची याबाबतची वक्तव्ये सरकारच्या दृष्टीने अधिकृत नाहीत, असे सांगितले. “मी संबंधितांशी काही करार केलेला नाही,‘ असे ते भडकून म्हणाले. लोकशाहीत विशिष्ट मुद्द्यांवर अनेकांच्या तीव्र भावना असू शकतात. या विषयाबाबत काहींची मते ही “राष्ट्रीयत्वाचा उच्चार‘ या दृष्टीने विचारात घेतली गेली पाहिजेत असे आपले मत आहे, असेही सांगून नायडू यांनी समतोल साधला.