भारत देशात बाळासाहेबांसारखा नेता मी पाहिला नाही!-पवार

0
9

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुण्यातील सारसबागेजवळ साकारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय राऊत, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, अशोक हरणावळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी आपल्या जुन्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला.आज पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांच्या कलादालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार होते.

श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हातामध्ये पुन्हा देशाची सत्ता जावी असं आणीबाणीच्या नंतर देशातल्या अनेक लोकांना वाटत होतं. मी त्यांच्यात नव्हतो. पण बाळासाहेब होते. आणि बाळासाहेब जाहीरपणे सांगायचे की या देशाला पुन्हा मजबूतीने पुढे नेण्यासंबंधी नेतृत्व हवं असेल तर इंदिरा गांधीच हव्यात. ही भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली होती. इंदिराजींचा पराभव झाला. हातातली सत्ता गेली. मोरारजीभाईंचं राज्य आलं.
त्यानंतरच्या काळात हे राज्यही फार काळ टिकलं नाही. पुन्हा इंदिरा गांधींची सत्ता यावी असं बाळासाहेबांना वाटत होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता आणि इंदिरा गांधींना शक्ती देण्याची देशाच्या दृष्टीने गरज आहे आणि बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला की माझा पक्ष शिवसेना हा एकही उमेदवार उभा करणार नाही.राजकीय नेता सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाही ही भूमिका एखाद्या नेत्याने आज घेतली तर लोक त्याला फिरूही देणार नाहीत. पण बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली आणि महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधींच्या विचारांचं राज्य आणण्याच्यासाठी पूर्ण योगदान दिलं. त्याचं कारण एकच की त्यांनी शब्द दिला होता. शब्दाची किंमत स्वतःच्या राजकीय सहकाऱ्यांवर, पक्षावर विपरित परिणाम करणारी असेल, पण आज देशाला शक्तिशाली कर्तृत्ववान नेत्याची गरज आहे. हे त्यांच्या मनाला पटल्यानंतर या प्रकारचा धाडसी निर्णय घेण्याची भूमिकासुद्धा बाळासाहेबांनी घेतली. माझ्या गेल्या 48 वर्षांच्या कालखंडामध्ये या प्रकारचा नेता मी भारतामध्ये पाहिला नाही.