माध्यमांनीच खडसेंचे पितळ उघडे पाडले

0
15

नागपूर – राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेले घोटाळे माध्यमांची बाहेर काढले. त्यामुळे खडसेंचे पितळ उघडे पडले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. खडसे यांनी केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली.

खासदार पटेल पुढे म्हणाले की आता फक्त भाजपची पहिलीच विकेट पडली आहे. अनेक जण बाद होण्याच्या पंक्तीत आहेत, अशी कोपरखडीही त्यांनी यावेळी लगावली. राज्यसभेवर फेरनिवड झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाल्याचे सांगितले. यावर सरकारने सारवासारव करण्यासाठी बरीच कसरत केली. मात्र, माध्यमांच्या सजगतेमुळे त्यांना यश आले नाही. भ्रष्टाचाराचा विरोध झाला पाहिजे, तो कोणत्याही समाजाचा असो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या फायर इस्टिंगव्हिशनचा घोटाळा समोर आला होता. मुख्यमंत्री व नितीन गडकरी केंद्रात मंत्री असल्याने विदर्भाचा विकास होईल, असा विश्‍वास होता. मात्र, दीड दोन वर्षांत काहीच झाले नाही. एकही उद्योग आला नाही, असेही पटेल म्हणाले.

दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करणारी भाजप आता स्वतःच्या खडसेंना तुरुंगात धाडणार की त्यांचा बचाव करणार हे ही पाहणे मजेशीर ठरणार असल्याचेही ते म्हणाले. आपल्या विरोधकांच्या मागे नाहक चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या भाजपची पोलपट्टी उघडायला जेमतेम सुरवात झाली आहे.