गोंदिया/गडचिरोली : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक असताना शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने गडचिरोली – चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांची उमेदवारी जाहीर करत सर्वसमावेशक अशा नव्या चेहऱ्याला संधी दिली. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे ते देखील ऐनवेळी नवा चेहरा पुढे करणार की विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठे लोकसभाक्षेत्र म्हणून गडचिरोली-चिमूर क्षेत्राची ओळख त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना प्रत्येक भागात पोहोचणे शक्य होत नाही. त्यात यंदा मतदानाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना शनिवारी रात्री उशिरा महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीसाठी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासोबत त्यांची रस्सीखेच होती.
राजकारण म्हणजे सत्ताकारण हा व्यवस्थेचा दृढ समज झाला आहे. पण, काही व्यक्तिमत्त्व अशी असतात, जे याकडे सेवेची संधी म्हणून बघतात. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर करतात. डॉ. नामदेव किरसान हे याच गटात मोडणारे. उच्चशिक्षित असलेले किरसान हे गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. या काळात राजकारणातून उत्तम समाजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. उच्चपदस्थ नोकरीला राम राम ठोकत त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत त्यांनी आपल्या कामाच्या आधारे अनेकांची मने जिंकली.
उच्च विद्याविभूषित असलेले किरसान उत्पादन शुल्क विभागात उपायुक्त होते. २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्षपासून,प्रदेश सरचिटणीस व गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंंघ समन्वयक ते काँग्रेसच्या अनेक पदावर त्यांनी काम केले.2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे.मग त्यांनी गडचिरोली ते नागपूर काढलेली पदयात्रा असो की विविध आंदोलनातून त्यांनी लोकांच्या समस्यांकरीता धावून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तेव्हापासून ते गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.दोनदा हुलकावणी मिळाल्यानंतर त्यांना यंदा संधी देण्यात आली आहे. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.गोंदिया जिल्हा हा त्यांचा मुळ जिल्हा असल्याने या जिल्ह्यातली आमगाव-देवरी मतदारसंघावरही त्यांचा प्रभाव आहेच.त्यातच किरसान यांचा स्वभाव व विचार हा सामाजिक चळवळीला पोषक असल्याने आदिवासी,दलीत,ओबीसीं,अल्पसंख्याकाच्या कुठल्याही आंदोलनात म्हणा किंवा त्यांच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग हिरहिरीचा असतो.त्यांच्या या कार्यामुळे सुध्दा त्यांना या निवडणुकीत नक्कीच कुठे तरी सहकार्य होण्यास मदत होणार यात शंका नाही.
खासदार अशोक नेते आपल्यालाच पुन्हा उमेदवारी मिळणार असे ठाम पणे सांगत असले तरी त्यांच्यापुढे मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि संघपरिवारातले डॉ. मिलिंद नरोटे यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळेच नाव घोषित व्हायला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ऐन धुळवडीत कुणाचा चेहऱ्याला रंग लागणार आणि कोण बेरंग होणार, याची सर्वत्र उत्सुकता दिसून येत आहे.