नानांचा फाजील ‘आत्म’विश्वास कार्यशून्य खा. मेंढेंच्या पथ्यावर?

0
12

इतरांशी जुळवून घेण्याची शैलीच्या आड येतोय अहंकार
मतदारांमध्ये वाढताहेत शंका-कुशंका
गोंदिया– संपूर्ण देशभरात सार्वजनिक निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. यातही भंडारा-गोंदिया मतदार संघात तब्बल २४ वर्षानंतर भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस एक एक जागेसाठी झुंजत असताना खुद्द राज्याचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यातच मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. नानांचा स्वभाव आणि जिल्ह्यात प्रचाराची कार्यपद्धती यावरून नानांचा ‘आत्म’विश्वास हा मतदारांमध्ये उदासिनताप्राप्त विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार यांच्या पथ्यावर तर पडणार नाही ना? अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसला विद्यमान खासदाराविरुद्ध मतदारांमध्ये असलेली नाराजी कॅश करून घेण्यासाठी इतरांशी जुळवून घेत आपल्या उमेदवारासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा खुद्द प्रदेशाध्यक्ष यांच्याच मतदार संघात कॉंग्रेसला तोंडघशी पडावे लागले, तर नवल नको.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास हा मतदार संघ तसा कॉंग्रेसचा मजबूत बालेकिल्लाच म्हणावा लागेल. या मतदार संघात बहुतांश वेळा प्रचंड मताधिक्य घेत कॉंग्रेसचे खासदार लोकसभेवर निवडून गेल्याचे दिसते. कॉंग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी कॉंग्रेसची निमिर्ती झाल्यावर याक्षेत्राचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेले. असे असले तरी मतदारांचा कॉग्रेसप्रती असलेल्या विश्वास मात्र काही केल्या कमी झाला नाही. याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमुळे आजच्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कायम घेतला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे मध्यंतरी भाजपला याचा फायदा झाला. कॉग्रेसच्या मतविभाजनामुळे विरोधकांना फायदा झाला असला तरी प्रत्यक्षात या मतदार संघात कॉंग्रेसचे मताधिक्य अधिक आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नानाभाऊ आणि राष्ट्रवादीचे प्रफुलभाई पटेल यांच्या अवतीभवतीच या जिल्ह्यातील राजकारण सतत फिरत आले आहे. या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष जिल्यातील मतदारांसाठी काही नवीन नाही.
आता २४ वर्षानंतर मतपत्रिकेवर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा ‘पंजा’ दिसणार असल्यामुळे मतदारांत कमालीची उत्सुकता सुद्धा बघावयास मिळत आहे. नानाभाऊंसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. याउलट महायुतीच्या दबावामुळे प्रफुल पटेल यांनी सुद्धा ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. असे असले तरी कॉंग्रेससाठी स्थिती अनुकूल आहे म्हटल्यास वावगे होणार नाही.
या मतदार संघातील लढत ही थेट नानाभाऊ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात होणार असा कयास लावला जात होता. एकीकडे कॉंग्रेससाठी एक एक जागा महत्वाची असल्याने नानाभाऊ स्वतः रिंगणात उतरतील अशी आशा होती. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ही भाजप, शिवसेना (शिंदे) तसेच इतर घटक पक्षा सोबत गेल्याने महायुतीत ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला. काँग्रेसने नाना पटोले यांनी ठरविलेल्या डॉ. प्रशांत पडोळे सारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देत सर्वानाच धक्का दिला. विशेष म्हणजे प्रचाराची धुरा जरी नाना पटोले यांनी आपल्या खांद्यावर घेतली असली तरी मतदार संघातील अनेकांना आपल्याशी जुळवून घेण्यात ते अपयशी ठरत आहेत. काँग्रेसच्या प्रचारावरून सध्यातरी आपला उमेदवार निवडून आणण्यापेक्षा विरोधकांना ही निवडणुक सोपी करण्यावर कॉंग्रेस नेतृत्वाचा भर अधिक दिसत आहे. यात नाना पटोले यांचा अति आत्मविश्वास की अन्य काही हे मात्र कळायला मार्ग नाही.
भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्याप्रती असलेली नाराजीचा फायदा काँग्रेस ला घेता आला असता. मात्र अजूनतरी त्यात नाना पटोले व काँग्रेस यशस्वी ठरलेली दिसत नाही. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा खुद्द त्यांनी आपल्या अंगावर घेतल्याचे बोलले जात असले तरी खरच त्यांना काँग्रेस चा उमेदवार निवडायचा की अजून काही तरी करायचे हे मात्र त्यांनाच ठाऊक.
एकंदरीत १९ ला होऊ घातलेल्या निवडणुकीला अजूनतरी वेळ आहे. तोपर्यंत नाना पटोले यांचा अति आत्मविश्र्वास कमी झाला तर ठीक नाहीतर खुद्द प्रदेशाध्यक्षांच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या पतनास कोणीही थांबवु शकणार नाही, एवढे मात्र निश्चित.