पंचायत समिती सभापती निवडीत काँग्रेस, भाजपाचा ‘वरचष्मा’!

0
10

वाशिम,दि.27 : जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांमध्ये आज सोमवारला (दि.२७)पार पडलेल्या सभापतीपदाच्या निवडणूकीत तीन ठिकाणी काँग्रेस; तर उर्वरित तीन ठिकाणी भाजपाचा ‘वरचष्मा’ राहिला. तसेच उपसभापतीपदाच्या निवडीमध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसने तीन पंचायत समित्यांमध्ये यश मिळविले असून इतर तीन पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, भाजपा आणि भारिपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.

जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहाही पंचायत समित्यांमधील सभापती-उपसभापतीपदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने सोमवार, २७ जून रोजी सर्वच पंचायत समित्यांच्या नुतन सभापती-उपसभापतींची निवड करण्यात आली. यात वाशिम पंचायत समितीमध्ये गजानन भोने (काँग्रेस) आणि मधुबाला चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची बिनविरोध निवड झाली. मालेगाव पंचायत समितीमध्ये सभापतीपदी मंगला गवई (भाजपा) यांची; तर ज्ञानबा सावळे (शिवसेना) यांची उपसभापतीपदी निवड झाली. कारंजा पंचायत समितीत सभापती वर्षा नेमाने (काँग्रेस), उपसभापती मधुकर हिरडे (राष्ट्रवादी काँग्रेस), रिसोड पंचायत समितीत सभापती प्रशांत खराटे (भाजपा), उपसभापती विनोद नरवाडे (भाजपा), मंगरूळपीरमध्ये सभापती निलीमा देशमुख (भाजपा), उपसभापती सागर खोडके (भारिप) आणि मानोरा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी धनश्री राठोड (काँग्रेस) यांची; तर रजनी गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची उपसभापती म्हणून वर्णी लागली