ग्रामपंचायतींच्या अडचणी दूर करा- सरपंच संघटनेची मागणी

0
30

आमदार सहषराम कोरोटे यांना निवेदन.
विविध मागण्यांना घेऊन ग्राम पंचायतींना कुलूप लावून कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा.

देवरी,ता.०६ :सद्यःस्थितीत ग्रामपंचायतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या संबंधी मागण्या शासनस्तरावरून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावे अन्यथा या मागण्यांना घेऊन ग्राम पंचायतींना कुलूप लावून कामबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या देवरी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांना गेल्या शुक्रवारी (दि. ०२) एका निवेदनातून देण्यात आले आहे.
या निवेदनात सरपंच परिषदेने म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने रद्द केलेले १५ लाख रुपयापर्यंतचे काम करण्याचे अधिकार शासन निर्णय काढून पूर्ववत करणे, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात स्टे आणणे, सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्या मानधनात भरीव वाढ करणे, सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांना कामाच्या ठिकाणी विमा कवच उपलब्ध करून देणे. आमदार, खासदार प्रमाणे ग्रामपंचायत स्थानिक विकास निधी उभा करून सरपंच यांना १० लाखापर्यंतची कामे करण्याचा अधिकार प्रदान करणे, ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या सर्व समितीचे अध्यक्षपद सरपंच यांना बहाल करणे. (उदा. शाळा व्यवस्थापन समिती, वनहक्क समिती), स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रातून सरपंच प्रतिनिधीसाठी दोन जागा राखीव कराव्यात, गावठाण लगत असलेली महसुली आणि वनहक्क व झुडपी जंगलाचे आरक्षित गटक्रमांक गावाच्या वाढत्या लोकसंखेला सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वळती करून गावठाण क्षेत्राला जोडण्यात यावे, रेतीघाट असलेल्या ग्रामपंचायातीना घाट लिलाव करण्याचे अधिकार बहाल करण्यात यावे, गौणखनिज व मुद्रांक शुल्क नियमित ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात यावे. अशा अनेक समस्यांच्या मागणीचा यात निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर आमदार सहषराम कोरोटे यांनी तुमच्या मागण्यांसंदर्भात आपण नक्कीच पाठपुरावा करून त्या मागण्या शासनस्तरावरून सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात देवरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर राऊत,सचिव कैलास मरसकोल्हे,उपाध्यक्ष सोनू नेताम, महादेव कोरे सरपंच परसोडी,लक्ष्मीकांत मरकाम सरपंच पुराडा, कैलास कुंजाम सरपंच देवाटोला, गुणवंताताई कवास सरपंच सेरपार, गौरव परसगाये डवकी, लताताई गावड,चिचेवाडा, कैलास साखरे सिंदीबिरी,सौ. आचलेताई मुरदोली, समिताताई कटरे कन्हाळगाव, भाग्यश्री भोयर चिचगड, पन्नालाल चौधरी, लोहारा, गोरेलाल मलये हरदोली आदींचा समावेश होता.