गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ.अश्विनी धात्रक शिवसेनेत दाखल

0
7

गडचिरोली, -: येत्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ.अश्विनी धात्रक यांनी काल आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासमवेत नगरसेविका सुषमा राऊत, देसाईगंजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कल्पना माडावार व पत्रकार दुबे हेही शिवसेनावासी झाले.
मुंबई येथील ‘शिवालय’ या शिवसेनेच्या मुख्यालयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व गडचिरोली जिल्हासंपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत डॉ.अश्विनी धात्रक यांनी शिवसेनेत एन्ट्री केली. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा परिषद सदस्या छायाताई कुंभारे, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, नीलकमल मंडल, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, रामकिरीत यादव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
२०११ मध्ये झालेल्या गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवा शक्ती संघटनेचे १३ सदस्य निवडून आल्याने या संघटनेची सत्ता प्रस्थापित झाली. पुढे १८ सप्टेंबर २०१५ रोजी डॉ.अश्विनी धात्रक नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. याच सुमारास पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. मात्र त्यावेळी एकही नगरसेवक त्यांच्यासोबत शिवसेनेत गेला नाही. आता पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेचे नगरसेवक ‘भाजप की काँग्रेस’ अशा संभ्रमात असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्रसिंह चंदेल यांनी चक्क नगराध्यक्षांनाच शिवसेनेत नेऊन सर्वांवर मात केली आहे. यामुळे गडचिरोलीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ.अश्विनी धात्रक यांच्या प्रवेशानंतर नजीकच्या काळात अन्य काही नगरसेवकही शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन भाजपवर निशाणा साधतील, असे बोलले जात आहे.