जलयुक्त शिवारच्या गावात सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबवा – जिल्हाधिकारी

0
21

भंडारा ,दि.22: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेल्या सर्वच गावात पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

जलयुक्त शिवार राबविण्यासाठी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे व उपसंचालक माधुरी सोनोने यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवारचा ग्रामनिहाय आढावा घेतला. 2015-16 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांसाठी अतिरिक्त कामे घ्यावयाची असल्यास यंत्रणांनी 15 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानातील गावामध्ये पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिरी देण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सिंचन विहिरी घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत येणाऱ्या गावांचे जलस्त्रोत बळकट करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करावे व तात्काळ अहवाल सादर करावा, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे सन 2015-16 च्या गावांचा नव्याने सर्व्हे करून त्याठिकाणी जलस्त्रोत बळकट करण्यासाठी अतिरिक्त कामे सूचवावी.

जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामाचे देयक तात्काळ अदा करणे अपेक्षीत असून पूर्वी झालेल्या किती कामाचे देयक प्रलंबित आहेत याचा आढावा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या अधिकाऱ्यामुळे देयक प्रलंबित आहेत अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सन 2016-17 च्या गावाचे आराखडे तयार करताना कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. त्याचप्रमाणे गाव जलयुक्त घोषित करताना शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करण्यात यावा. प्रस्तावित कामावर मंजूर निधी वेळेत खर्च करण्याची जवाबदारी संबंधित यंत्रणेवर राहिल, असे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवारमध्ये कामाचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. प्रत्येक यंत्रनेने छायाचित्र अपलोड करण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.