गोंदिया-भंडारा विधानपरिषदेसाठी भाजपची उमेदवारी जाहीर

0
10

गोंदियातील एका काँग्रेसनेत्याची केंद्रीय मंत्र्यांच्या दारात हजेरी

गोंदिया : येत्या १९ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी गोंदिया-भंडारा मतदार संघातून भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने नागपुरातील केंद्रीय मंत्र्यांच्या दारात हजेरी लावली असल्याने या मतदार संघातील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मतदारांच्या मनात कालवाकालव सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज भाजपच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत गोंदिया-भंडारा मतदार संघातील उमेदवारी संदर्भात प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यामध्ये नागपूर येथील व्यावसायिक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले परिणय फुके यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. यावेळी मतदार संघाबाहेरील उमेदवार दिल्याने स्थानिक इच्छुक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच विधान परिषदेची निवडणूक लावल्याने या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात येत्या १९ नोव्हेंबरला होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष इच्छुक आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, नगर परिषद आणि नगर पंचायतींचे सदस्य मतदार राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात २०० तर भंडारा जिल्ह्यातील १९५ मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही महिन्यापासून डोळे लागलेल्या या निवडणुकीत विविध पक्षांनी विजयाची समीकरणे बांधणे सुरू केले आहे.
गेल्या १२ वर्षांपासून या मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून आमदार राजेंद्र जैन हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत जागेसंबंधाने प्रचंड कुरबूर माजली आहे. डिसेंबर २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या वाढली आहे. परिणामी, सर्वच पत्र आकडेमोडीत व्यस्त झाले आहेत.
या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात मोहाडी, लाखनी, लाखांदूर तर गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, देवरी या नगर पंचायतीतील सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याने मतदारसंख्या ३९५ झाली आहे. यात भंडारा जि.प. ५२, गोंदिया जिप. ५३, गोंदिया जिल्हा पंस सभापती ८ व भंडारा ७, भंडारा नप ३५ गोंदिया नप ४४, तुमसर २५ तिरोडा १९ पवनी १९ गोरेगाव १९ मोहाडी १९, अर्जुनीमोर १९ लाखनी १९ सडक अर्जुनी १९ लाखांदूर १९ व देवरी १९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
एका काँग्रेसच्या बड्या नेत्याची वाड्यावर हजेरी
या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून या मतदार संघात शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील दिलजमाई हा कुतूहलाचा विषय आहे. सध्या काँग्रेसकडून प्रफुल अग्रवाल तर राष्ट्रवादीकडून आमदार राजेंद्र जैन यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील एका वजनदार काँग्रेस नेत्याने नागपुरातील एका केंद्रीय मंत्र्याच्या घरी आपली हजेरी लावल्याने काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मतदारांची धडधड वाढली आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीच्या कोट्यात विधान परिषदेची तिकीट गेली तर काँग्रेसच्या मतदारासमोरील प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत. या बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी पक्षादेश झुगारून भाजपला मदत तर करणार नाही ना? अशी शंका जिल्हावासीयांना आहे.