गोंदिया-भंडारा मतदारसंघातील मतदारांचे भाव वधारले

0
9

 

  • नागपूरातील 200वर बाऊंसर्स मतदारसंघात दाखल
  • भाजपचे परिणय फुके आज नामांकन दाखल करणार

 

खेमेंद्र कटरे

 

गोंदिया- नुकत्याच होऊ घातलेल्या गोंदिया-भंडारा विधान परिषदेच्या निवडणुकीत एका बड्या राष्ट्रीय पक्षाच्यावतीने मतदारांना देऊ केलेल्या रकमेत भरघोष वाढ करीत मोबदला म्हणून 50 लाख रोख वा कायम नोकरी, अशी ऑफर दिली आहे. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने मतदारांना प्रभावीत करण्यासाठी नागपूरहून सुमारे 200 खास बाउंसर्सची टोळी या मतदारसंघात पाठविल्याच्या चर्चेने भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने नागपूरातील परिणय़ फुके हे आपला नामांकन आज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.उल्लेखनीय म्हणजे साप्ताहित बेरारटाईम्सने यापूर्वी भाजप या निवडणुकीत ओबीसी कॉर्ड खेळणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

येत्या 19 नोव्हेंबर रोजी राज्यात विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या जागांसाठी निवडणुक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. आज भाजपच्या वतीने नागपूरचे नगरसेवर परिणय फुके हे नामांकन दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण या निवडणुकीमुळे चांगलेच तापलेले असताना या मतदारसंघातील मतदारांचे भाव एका प्रमुख पक्षाने चांगलेच वाढविल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. यानुसार, आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावे यासाठी नगरसेवक, सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांना प्रत्येकी 50-50 लाख वा कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. हा निवडणुकीचा फंडा राबविण्यासाठी व मतदारांना प्रभावित करण्यासाठी नागपूरवरून सुमारे 200 खास बाऊंसर्सची टोळी दोन्ही जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे. हे बाऊंसर्स पिशवीमध्ये रक्कम घेऊन चक्क मतदारांना गाठत असून त्यांना प्रभावाने अज्ञात स्थळी रवाना करीत असल्याची चर्चा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. परिणामी, मतदारांचे अच्छे दिन आल्याचे  बोलले जात आहे.

मतदारांची खरेदी करणाऱ्या पक्षाच्या वतीने कॉंग्रेसच्या मतदारांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. गोंदियातून कॉंग्रेसच्या वतीने डमी उमेदवार पक्षाच्या वतीने उभा केला जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी गोंदिया जिल्ह्याबाहेरील कॉंग्रेसची मते त्या पक्षाला विकली जाणार असल्याचे नियोजन दोन्ही पक्षाचे नेते करीत असल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग आहे. याकडे निवडणुक आयोगाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.