राष्ट्रवादी लढविणार न.प.च्या सर्व जागा

0
9

गोंदिया दि.२9: : गोंदिया नगर परिषदेच्या येत्या ८ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी दिली. नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्याचे काम सुरू असून स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनी सांगितले. गोंदिया नगर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. तरीही शहराची दुर्दशा झाली आहे. रस्ते, लाईट, पाणी, कचरा या मुलभूत समस्याही सोडविण्यात सत्तारूढ भाजपला यश आले नाही. एवढेच नाही तर शहरातील बगिच्यांपासून नगर परिषदेच्या शाळांपर्यंत सर्व ठिकाणी दुर्दशा आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता देण्याची विनंती आम्ही करणार असल्याचे जैन यांनी सांगितले. गोंदिया नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि कामांचा दर्जा सर्वपरिचित आहे. त्यातच भाजप आणि काँग्रेसची छुपी युती असून आम्ही ती जनतेसमोर उघडणार करणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपच्या नागपूरच्या उमेदवाराला विजयी करून भाजप-काँग्रेसने जिल्ह्याचे नुकसान केले, ही गोष्टी नागरिकांनी समजून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादीने केले.