नोटाबंदी विरोधात काँग्रेसचा मोर्चा

0
9

गोंदिया दि.२9: केंद्रातील मोदी सरकार प्रत्येक कामात अयशस्वी झाल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने सोमवारी गोंदियात मोर्चा काढून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यात सरकारने सामान्य नागरिकांना नोटाबंदीमुळे अडचण निर्माण करून मोठी अडचण निर्माण केली असून त्यामुळे मजबुरीने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी भाजप सरकार पूर्णपणे दोषी असून ही नोटाबदी मागे घ्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली.
आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, महासचिव सहेषराम कोरोटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या अनेक अडचणी मांडण्यात आल्या. अशा सरकारला देशातील जनता नक्कीच त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी निवेदनातून देण्यात आली. यावेळी डॉ.झामसिंह बघेले, पृथ्वीपालसिंग गुलाटी, जि.प.सभापती पी.जी.कटरे, उषाताई सहारे, अशोक चौधरी, गोविंद शेंडे, जि.प.पक्षनेता रमेश अंबुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.