‘एकीकडे सामान्य माणूस रांगेत उभा, तर दुसरीकडे कोट्यवधीचं घबाड सापडतं कसं?’-शिवसेना नेते एकनाथ शिंदे

0
8

गडचिरोली,:’एकीकडे सामान्य माणसाला दोन हजार रुपयांसाठी रांगेत उभे राहावं लागतं, तर दुसरीकडे काही लोकप्रतिनिधींच्या घरात कोट्यवधीचं घबाड सापडतं कसं?, असं सवाल करुन शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली.
गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे असलेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ इंदिरा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, दाजी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, महिला आघाडीप्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, डॉ. अश्विनी धात्रक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच नोटाबंदीवरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे काळ्या पैशाच्या वापरावर आळा घालण्याला समर्थन आहे. परंतु त्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीमुळे गोरगरीब माणसाला प्रचंड त्रास होत आहे. दोन हजार रुपये काढण्यासाठी त्याला तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे काही जणांच्या घरात कोट्यवधीचं घबाड सापडत आहे. हे घबाड कसं सापडलं, असा सवाल करुन एकनाथ शिंदे यांनी सहकारी बँका व पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय म्हणजे सामान्य माणसाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रकार असल्याची जोरदार टीका केली.
नोटाबंदीविषयी केंद्र सरकारने अवलंबिलेली कार्यपद्धती व नियोजनाला शिवसेनाप्रमुखांचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नव्हे, तर जनतेशी आहे, असे सांगून श्री.शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकही सभा न घेता २६ नगरपालिकांचे अध्यक्ष शिवसेनेचे झाले, हे अभिमानाने सांगितले.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून नगरपालिकेला केवळ १ कोटी रुपये दिले. मात्र आपण पालकमंत्री असलेल्या व अन्य जिल्ह्यांना तब्बल साडेचार कोटी रुपये प्रत्येकी दिले. नगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास भरपूर निधी देऊन गडचिरोलीचा विकास करु, असे आश्वासनही श्री.केसरकर यांनी दिले.