बहुजनांनो, गडचिरोलीतील घराणेशाहीला हद्दपार करा

0
8

गडचिरोली दि. १६: गडचिरोली नगर पालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच विविध आघाड्यांनी घराणेशाहीचा अजेंडा कायम ठेवला आहे. आजपर्यंत सत्ता उपभोगलेल्या प्रस्थापित घराणेशाहीच्या उमेदवारांना या निवडणुकीत हद्दपार करा, बहुजन समाजातील उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

पुरोगामी लोकशाही मोर्चा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर बीआरएसपीचे गडचिरोली प्रभारी प्रा. संजय मगर, जिल्हाध्यक्ष विलास कोडापे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बेबी आबाजी चिचघरे, सतीश चिचघरे, डॉ. कैलास नगराळे, संभाजी ब्रिगेडचे अक्षय ठाकरे, गजानन बारसिंगे, पंकज भडके, नईमा शेख, ज्योती ब्राम्हणवाडे, प्रदीप मडावी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. संजय मगर म्हणाले, गडचिरोली शहरातील बहुजनांच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारा उमेदवार नगर पालिकेत हवा. त्यामुळे पैशाने आपले मत न विकता पुरोगामी लोकशाही मोर्चाच्या पाठीशी खंबीर उभे राहा, असे सांगितले. यावेळी सतीश चिचघरे यांनी शहर विकासाचा अद्यावत आराखडा मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कोडापे, संचालन राज बन्सोड यांनी केले तर आभार प्रीतेश अंबादे यांनी मानले.