देशाच्या अखंडतेसाठी आरक्षण, संविधान बचाव

0
20

नागपूर : आरक्षण व संविधानाला विरोध केला जात आहे. याचा कार्यभार नागपुरातून चालत आहे. देशातील एकता व अखंडता संकटात टाकली जात आहे. यामुळे आता लोकांनीच आरक्षणवादी व संविधानवादी होणे आवश्यक झाले आहे. हा महामोर्चा त्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवारी ‘आरक्षण बचाव-संविधान बचाव’ महामोर्चाने विधानभवनाला धडक दिली. मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटवर या मोर्चाला अडविण्यात आले. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. भाऊ लोखंडे, नागेश चौधरी, किशोर ढमाले, हाजी नासीरभाई, अ‍ॅड. अनिल काळे, अ‍ॅड. रमेश भिजेकर, हरिभाऊ भदे, आ. बळीराम सिरसकर, मिलिंद पखाले, नगरसेवक राजू लोखंडे, अमृत मेश्राम, हरेन श्रीवास्तव, अ‍ॅड. संजय पाटील, नरेश वाहाणे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.

या मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व भालचंद्र कांगो यांनी केले. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, संविधानाच्या निर्मितीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाच्या विरोधात खोटा प्रचार करीत आला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधूता व न्याय या मानवी मूल्यांना ते विरोध करीत आहे. यामुळे प्रत्येकाने जागरूक होऊन त्याकडे पाहणे गरजेचे झाले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले.

विशेष म्हणजे, मोर्चाचे कुठलेही निवेदन कुणा मंत्र्यांना देण्यात आले नाही. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन संघर्ष समिती, रिपब्लिकन मुव्हमेंट, वेल्फअर पार्टी आॅफ इंडिया, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक शिक्षक सभा, रिपब्लिकन पँथर्स, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन, आंबेडकरी प्रबोधन मंच, फुले-आंबेडकर विचारधारा, सीपीआय, विदर्भ शिक्षक संघर्ष समिती, डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी व राष्ट्रीय ओबीसी महासंघ आदींचा सहभाग होता.