काँग्रेसने कापले बंडोपंत मल्लेलवारांचे तिकिट

0
10

गडचिरोली, berartimes.com दि.१: वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार यांचे तिकिट काँग्रेसने कापले असून, पक्षाने नवीन उमेदवाराचा शोध घेणे सुरु केले आहे.बंडोपंत मल्लेलवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी यापूर्वी अनेक वर्षे जिल्हा परिषद गाजवली आहे. परंतु २०१३ मध्ये नक्षल्यांना साहित्य पुरविल्याच्या आरोपावरुन त्यांना तुरुंगात जावे लागले. मागील वर्षी जामीनावर बाहेर पडल्यानंतर यंदा त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने त्यांनी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांचाही त्यांच्या उमेदवारीला विरोध नव्हता. मात्र अचानक माशी शिंकल्याने त्यांचे तिकिट अडचणीत आले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मल्लेलवार यांचे नक्षलसंबंधी गुन्ह्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना तिकिट देता येणार नाही, असे सांगून त्यांना ए,बी फार्म नाकारला. यामुळे मल्लेलवार महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढविणार असून, त्यांच्या गोटातील पंचायत समितीचे दोन उमेदवारही याच पक्षाकडून रिंगणात उतरणार आहेत.