गोंदियात बालविवाह टळला;सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

0
11

गोंदिया,berartimes.com दि.01 : कायद्याने देशात बालविवाहाला बंद असून, बालविवाहाविरोधात व्यापक अशी जनजागृती केली जात आहे. परंतु, आजही बालविवाह होत असल्याची घटना बुधवारी (दि.१) शहरात उघडकीस आली. बालसंरक्षण विभाग, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच पुढाकार घेऊन होऊ घातलेला बालविवाह टाळला.
जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मानेगाव येथील चुन्नीप्रसाद उपाध्याय यांचा मुलगा सुधीर उपाध्याय (वय २६) याचे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील १६ वर्षीय बालिकेशी विवाह ठरला होता. वसंत पंचमीचा शुभमुहूर्तावर बुधवारी (दि.१) सायंकाळी सात वाजता गोंदिया येथील राजस्थानी ब्राम्हण भवनात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली, केवळ विवाह सोहळा संपन्न होण्याची लग्नघटीकेची प्रतिक्षा होती. अशात, बालविवाह सोहळ्याची माहिती बाल संरक्षण विभागाला मिळाली.
माहिती मिळताच, बाल संरक्षण अधिकारी सुहास एस. बोंदरे यांनी संपूर्ण माहिती काढली व पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी केलेल्या चौकशीत सदर विवाह हा बालविवाह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, बाल संरक्षण अधिकारी बोंदरे, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाच्या मंडळींना बालविवाह कायदा, कायद्याचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई, बालविवाहाचे दुष्परिणाम आदीची माहिती देऊन त्यांचे समुपेदशन केले. त्यानंतर दोन्ही पक्षाने नियोजीत लग्न रद्द केले.
ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुहास बोंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी प्रविण वाकडे, बाल कल्याण समिती सदस्य छाया बोरकर, निता खांडेकर, परिवेक्षाअधिकारी राजू बोदले, सामाजिक कार्यकर्ते मुकेश पटले,मनीषा चौधरी यांनी केली.