भाजपाकडून जाहीरातींवर ५०० कोटींचा खर्च निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार-नवाब मलिक

0
15

मुंबई,berartimes.com दि. १६ महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून दिली असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून या विरोधात आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजप पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाखांची मर्यादा असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा खर्च भाजपाच्या उमेदवारांवर सम-समान लादून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.भारतीय जनता पक्षाकडून वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांना जाहिराती देण्यात आल्या आहेत. वास्तविक या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र भाजपने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करुन कायद्याचा भंग केला आहे, असेही मलिक म्हणाले.
भाजपाकडून सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांची गळचेपी सुरु आहे. मध्यंतरी एनडीटीव्हीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता सामना पेपर वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा पद्धतीने भाजपाकडून माध्यमांवर बंधने घालून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना आता सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास भीती वाटत असेल तर त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पाठिंबा काढून घ्यावा. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना किंवा भाजपा या कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा देणार नसल्याचा उल्लेख करीत मुदतपूर्व निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईत १७४ जागेवर अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्या ५३ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेले नाहीत अशा जागी तेथील जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून भाजप-सेना-मनसे-एमआयएम सोडून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराला किंवा ताकदीच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.