प्रवीण दरेकर शिवसेनेच्या वाटेवर?

0
14

मुंबई-मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. भाजप नेते आणि प्रवीण दरेकर यांच्यात तशा गाठीभेटी झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत होते. मात्र, आज त्यांनी थेट उद्धव यांची भेट घेतल्याने दरेकर आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राज ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. आमदारांनी काम न केल्यामुळे मनसेचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्यानंतर नाराज झालेल्या दरेकर यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात राज यांनी दरेकर यांचा राजीनामा स्विकारत कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, असा फतवा काढला होता. ज्यांनी राजीनामे दिले यांच्याशी मी पाश तोडले असून तुम्हीही संपर्क ठेवू नका, असेही स्पष्ट करत राज यांनी प्रवीण दरेकर, वसंत गिते आणि चांडक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.