भाजपच्या लाटेतही यशोमतींनी गड राखला

0
11

अमरावती दि.२६-:तिवसा विधानसभा, बाजार समिती, नगरपंचायत, खरेदी-विक्री संघ व सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही तिवसा तालुक्यात आ.अँड़यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. भाजपच्या लाटेतही अँड़.यशोमती ठाकूर यांनी गड राखला आहे.
तिवसा पंचायत समितीचे सहा पैकी तीन सदस्य काँग्रेसचे आहेत. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयासाठी पक्षाचे यश कायम ठेवण्याचे आव्हान आ.अँड़यशोमती ठाकूर यांच्यासमोर होते. सर्वत्र भाजपाचे वातावरण असताना दांडगा जनसंपर्क व विकासाच्या जोरावर आ.अँड़यशोमती ठाकूर व माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या नेतृत्वात मतदारसंघात ११ पैकी ६ सर्कलमध्ये काँग्रेसने विजय मिळाला आहे.
तालुक्यात तीन पैकी दोन जागी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे सेनेसोबत झालेल्या निकराच्या झुंजीत काँग्रेसचे अभिजित बोके हे युवा उमेदवार विजयी झाले. येथे भाजपा चौथ्या क्रमांकावर राहिला. तर लढा संघटनेचे योगेश लोखंडे तिसर्‍या स्थानावर राहिले.
कुर्‍हा सर्कलमध्ये काँग्रेसच्या पुजा आमले तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ३0९ मतांनी विजयी झाल्या. येथे भाजपाच्या दर्शना वानखडे दुसर्‍या स्थानावर राहिल्या. तर वर्‍हा सर्कलमध्ये लढा संघटनेचे संस्थापक संजय देशमुख यांच्या पत्नी गौरी देशमुख १ हजार ६९८ मतांनी विजयी झाल्या. येथे काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिली. काँग्रेसच्या विद्या बोडखे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी भाजपाच्या मिनाक्षी नीलेश लोखंडे राहिल्या. त्याशिवाय मतदारसंघातील अन्य सर्कलमध्येही काँग्रेसने अँड़ यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळविले. मतदारसंघात असणार्‍या वलगाव, साऊर, शिराळा व पुसदा सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले आहेत. या व्यतिरिक्त अमरावती पंचायत समितीमध्ये पाच सदस्यांनी विजय मिळविला. भातकुली तालुक्यात देखील एका ठिकाणी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य विजयी झाला आहे.