उत्तर प्रदेशात दलित-ओबीसी मुख्यमंत्री व्हावा- साक्षी महाराज

0
8

वृत्तसंस्था
लखनऊ, दि. 11 – उत्तरप्रदेशात भाजपाने प्रचंड मोठी आघाडी घेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा सत्तेवर येणार आहे हे जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळे आता सत्तेनंतरची समीकरणं जुळवणं सुरु झाल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपा खासदार साक्षी महाराजांनी ओबीसी कार्ड टाकलं असून मुख्यमंत्रीपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 290 जागांवर आघाडीवर असून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 75 आणि मायावतींची बसपा 20 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे भाजपाला 1991 नंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश निवडणुकीत इतकी मोठी आघाडी मिळाली आहे. 1991 मध्ये भाजपा 221 जागांसह बहुमत मिळवत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उचलला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केलेला नसून संसदीय बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल, असं जाहीर केलं आहे. सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री नेमका होणार कोण हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उत्तरप्रदेशात 20 ते 22 टक्के दलित समाज आहे, तर 27 टक्के मागासवर्गीय आहेत. हे लक्षात घेता दलित किंवा ओबीसींना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी साक्षी महाराजांची इच्छा आहे.