अखेर दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी

0
10
मुंबई, दि. 11 – तूर खरेदीवरुन शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अपमान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मन दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे रावसाहेब दानवे यांनी  गुरुवारी प्रसिध्दी माध्यमांना प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे. जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना दानवे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे विधान दानवेंनी केले होते. आपण भाजप कार्यकत्यांशी सवांद साधत होतो असे म्हटले आहे.केंद्र व राज्याच्या सरकारची कामगिरी गावापर्यंत पोचावी यानिमित्ताने सुरु असलेल्या संवाद अभियानातंर्गत कार्यकर्त्यांना आपण एवढी तुर खरेदी केली तरी लोक आरोप करतात त्या प्रश्नावर उत्तर देत होतो,असेही मह्टले आहे.
शेतक-यांची बाजू घेत मी 35 वर्ष राजकारण केले. त्यांचे दु:ख मला कळते. मी स्वत शेतक-याच्या पोटी जन्म घेतलाय असे दानवे म्हणाले. कार्यकर्त्यांमधील संवादाला शेतक-यांशी जोडू नका असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निषेध केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक असून, या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान तरी करू नये असे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान सत्तेतील भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेनेही डोंबिवलीत व लातूरात मोर्चा काढून दानवेंच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेनेनंही दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या गाढवावरुन धिंड काढली. डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला.