पालकमंत्र्यांचा भेटीने जि.प.त खळबळ

0
10
गोंदिया, ता. १२ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (ता.१२) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा परिषदेला आकस्मित भेट दिली. या वेळी कार्यालयीन वेळेत विविध विभागाचे प्रमुख कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करीत उशिरा पोहोचलेल्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. पालकमंत्र्यांच्या आकस्मिक भेटीमुळे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
शासकीय अधिकारी, कर्चामऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून कामकाजात पारदर्शकता ठेवावी, याकरिता सर्वच कार्यालयात बायोमेट्रीक प्रणाली लावण्यात आली आहे. मात्र, येथील शासकीय कार्यालयांमध्ये शासनाच्या नियमावलीला तिलांजली दिली गेली आहे. कधीही येणे अन् कधीही जाणे असे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. सर्वसामान्यांची कामे रेंगाळत आहेत. याबाबतच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे अलीकडेच आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटीचा सपाटा लावला आहे. सोमवारी जिल्हा परिषदेला दिलेल्या भेटीदरम्यान, त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी त्यांना जागोजागी अस्वच्छता दिसून आली. त्यानंतर, प्रत्येक विभागात जाऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यात अनेक विभागप्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नागरिकांची कामे वेळेवर व्हावी, म्हणून अधिकारी व कर्चामऱ्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र,शासनाच्या नियमांना तिलांजली देत बहुतांश कर्मचारी नागपूर, भंडारा येथून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तथापि, सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, निर्देश पालकमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले. कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील तर, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी वसाहत बनून तयार आहे. मात्र तेथील विद्युतीकरण व इतर काही कामे झाली नसल्याने ती वसाहत मोडकळीस येण्याच्या स्थितीत आहे. येत्या दोन महिन्यात वसाहतीतील कामे पूर्ण करून कर्मचाऱ्यांना तेथील क्वार्टर उपलब्ध करून देण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकरे यांच्या कॅबीनमध्ये घेतला. यात अनेक कामे प्रलंबित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता आले नाही. त्यामुळे त्यांनी अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामे व्यवस्थित करा, महिनाभरात केलेल्या कामांचा तपशील द्या, असे निर्देश दिले.