कर्जमाफी ही शेतकरी व विरोधकांच्या संघर्षाचे यश-आ.वड्डेटीवार

0
12

चंद्रपूर,दि.25: राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची शनिवारी घोषणा केली. ही कर्जमाफी शेतकरी व विरोधकांच्या संघर्षाचे यश आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे काँग्रेसचे उप गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली.

शासनाने कर्ज माफ करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम संप पुकारला होता. तत्पूर्वी विरोधकांनीही संघर्ष यात्रा काढली होती. सरकारला इच्छा नसूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकावे लागले. या कर्जमाफीबाबत जिल्हानिहाय व बँकानिहाय जर सरकारने आकडे जाहीर केले तर ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे का, हे स्पष्ट होईल, असे आ. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना फायदा होईल. मात्र शेतकरी पूर्णपणे कर्जातून मुक्त होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा फायदा होईल, असे सांगितले आहे. या घोषणेनुसार केवळ ४० लाख शेतकऱ्यांचाच सातबारा कोरा होणार आहे. उर्वरित ४९ हजार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोझाच राहणार असल्याचेही आ. वडेट्टीवार म्हणाले.