पालकमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार कामांची पाहणी

0
14

भंडारा,दि.25 : राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भंडारा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, बंधारे, वनतलाव आदी कामांची पाहणी केली. त्यात कोका जंगलातील वनतलाव तसेच कृषि विभागांतर्गत बांधण्यात आलेले बंधारे व तलावाचा समावेश आहे.यावेळी त्याच्या समवेत आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लोखंडे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

वन विभागातर्फे चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या कोका येथील रोपवाटिकेस पालकमंत्री डॉ. सावंत यांनी भेट दिली व रोपांबाबत माहिती जाणून घेतली. या रोप वाटीकेत साग, आवळा, बांबु आदि प्रकारची रोपे असल्याची माहिती उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांनी दिली. तसेच कोका अभयारण्यात पर्यटक मोठया प्रमाणात येतात, त्यांना खाजगी वाहनाद्वारे वन भ्रमण करावे लागते. त्यासाठी वन विभागाने स्वत:ची जिप्सी वाहनसेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ १६०० ते १८०० रूपयात जगंल सफारीचा आनंद घेता येईल, असेही ते म्हणाले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील र्विसी येथील सिमेंट नाला बांधकामाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या कामामुळे मुबलक पाण्याची सोय उपलब्ध होणार असून त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी विर्सी येथील गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.