चंद्रकांत पाटलांनी दिली 5 कोटींची ऑफर- हर्षवर्धन जाधव

0
13

औरंगाबाद,दि.15(विशेष प्रतिनिधी) : “माझ्या कन्नड मतदारसंघातील रस्त्याची चाळणी झाली आहे. 2016 मार्च मध्ये मंजुर झालेल्या कामांचे दीड वर्ष टेंडर निघत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार घेऊन गेलो तर ते काम करण्याचे सोडून मलाच आमच्या पक्षात या तुम्हाला पाच कोटी रुपये देतो असे आमिष दाखवतात,” असा खळबळजनक आरोप कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

17 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांची आपण भेट घेतल्याचे सांगत या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले,
“कन्नड तालुक्‍यातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील काहीच उपयोग न झाल्यामुळे मी थेट चंद्रकांत पाटलांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यावरून नागरिकांकडून मारले जाणारे टोमणे यांची माहिती दिली. यावर ते ठोस निर्णय घेऊन माझ्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडवतील असे वाटले होते. “”पण त्यांनी मला ‘ शिवसेनेचा राजीनामा द्या, निवडणूकीसाठी तुम्हाला पाच कोटी रुपये देतो, निवडून आल्यावर भाजपमध्ये ‘या अशी थेट ऑफर दिली. तुमच्या सोबत आणखी कुणी येणार असतील तर त्यांनाही घेऊन या असेही चंद्रकांत पाटील म्हणाले,”असा दावा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.यावर आपण त्यांना एवढे पैसे मला देण्याऐवजी मतदारसंघातील कामे करून द्या, मला तुमच्या पाच कोटींची गरज नसल्याचे मी त्यांना सांगितले असल्याचे आमदार जाधव यांचे म्हणणे आहे .