दिल्ली निवडणूक: अमित शाहांच्या हाती सर्व सूत्रे

0
10

नवी दिल्ली- सात फेब्रुवारीला दिल्लीत होणा-या निवडणुकीसाठी भाजपने संपूर्णपणे झोकून दिले आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी 70 जागाच्या दिल्ली विधानसभेसाठी ‘मिशन-60’ ठेवले आहे. पक्षाला कोणत्याही परिस्थितीत 60 जागा जिंकायच्या आहेत. यासाठी खुद्द अमित शहा हे प्रचाराचे व निवडणुकीची रणनिती आखत आहेत. निवडणूक रणनितीला अंतिम स्वरूप देण्यासाठी गुरुवारी अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांसह दिल्लीतील नेत्यांची बैठक घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांत उत्साह दिसत नसल्याने अमित शाह यांनी दिल्लीतील नेत्यांना चांगलेच फटकारले. कार्यकर्त्यांना पुरेसा व ठीकसा प्रचार होत नसल्याचे शाह यांचे म्हणणे होते. तसेच पक्षाची पत्रकेही सर्व भागात गेल्या नसल्याचे नेत्यांच्या लक्षात आणून दिली. शाह यांनी नेत्यांनी सूचना दिल्या की त्यांना वाटून दिलेल्या भागात प्रचार करीत लोकांशी संपर्क साधावा.

विजन डॉक्यूमेंट आणणार भाजप, केजरीवालांना विचारणार रोज 5 प्रश्न
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी यंदा घोषणापत्र ऐवजी व्हिजन डॉक्युमेंट आणण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, 6 फेब्रुवारीपर्यंत भाजप प्रत्येक दिवशी केजरीवालांना रोज 5 प्रश्न विचारेल. ज्याचे उत्तर केजरीवालांना जनतेला द्यावे लागेल.

किरण बेदींवर अमित शाह नाराज- भाजपचे व्हिजन डॉक्युमेंट येण्याआधीच एक दिवस किरण बेदी यांनी आपली ब्ल्यूप्रिंट सादर केल्याने भाजप आणि अमित शाह नाराज झाले आहेत. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बेदी यांनी बुधवारी टि्वटरवरूनच 25 मुद्दे टि्वट करून आपले व्हिजन जाहीर केले होते. अशावेळी पक्षाच्या वतीने घोषणापत्राच्या तयारीत असलेल्या दिल्लीतील नेत्यांना बेदींनी तोंडघाशी पाडले आहे. त्यामुळे या समितीत असलेल्या नेत्यांनी पक्षाकडे बेदींच्या कृतीबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे पक्षाने घोषणापत्र न आणण्याचा निर्णय घेतला आहे. घोषणापत्र समितीचे प्रमुख केंद्रीयमंत्री हर्षवर्धन आहेत. घोषणापत्रात काही मुद्यांचा समावेश करण्यावरून बेदी आणि दिल्लीतील जुन्या नेत्यांत मतभेद असल्याने घोषणापत्रच न आणण्याचा निर्णय अमित शहा व भाजपने घेतला आहे. मात्र, यातून बेदींनी शाहसह सर्वच नेत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. किरण बेदींपेक्षा आप व केजरीवाल काही सर्व्हेत पुढे असल्याने भाजपने प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मोदींच्या चार बड्या प्रचारसभांसह छोट्या-मोठ्या 250 सभा होणार आहेत. याचबरोबर 120 खासदारांना या निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी कामाला लावले आहे. प्रत्येक मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित करून किमान प्रत्येक मतदारसंघात एक हजार बॅनर लावण्याचे भाजपचे नियोजन आहे. याचबरोबर आरएसएससह 13 राज्यांतील कार्यकर्ते प्रचारात सहभाग घेणार आहेत.