‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध, दिल्लीकरांवर आश्वासनांची खैरात

0
20

नवी दिल्ली, दि. ३१ – महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसेच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज ‘आम आदमी पक्षा’चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने कोणतीच आश्वासने पूर्ण केली नसल्याची टीका करत आमच्यासाठी मात्र हा जाहीरनामा अतिशय पवित्र असून जे बोलतोय ते करून दाखवू असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.
दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार, स्वराज कायदा करून लोकांना अधिकार देणार, दिल्लीला औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटन केंद्र बनवणार, फास्ट ट्रॅक कोर्ट्स स्थापन करणार अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहे.

काय आहेत जाहीरनाम्यातील मुद्दे :
– जाहीरनाम्यात महिला, वृद्ध, युवकांचे शिक्षण, रोजगार यासाठी अनेक योजना.
– दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार
– महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार.
– लाचखोरीला पूर्णपणे लगाम घालणार.
– दिल्लीला वाय-फाय सिटी बनवणार, वीज स्वस्त करणार, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार.
– सरकारी कर्मचा-यांसाठी निवृत्तीनंतर हाऊसिंग स्कीम व कॅशलेस मेडिकल स्कीम आणणार.
– २० नवी कॉलेजेस उघडणार, सध्याच्या कॉलेजेसमध्ये सीट्स वाढवणार. खेळांसाठी नवी स्टेडियम्स बनवणार.
– प्रत्येक घरात रोज कमीत कमी २ तास तरी पाणी येईल. येत्या ५ वर्षांत प्रत्येक घरात पाण्याची पाईपलाईन असेल. पावसाचे पाणी साठवून त्याचाही योग्य उपयोग करण्यात येईल.
– रिक्षावाल्यांची समस्या दूर करणार, नवीन स्टँड उभारणार
– वकिलांसाठी आरोग्य आणि गृहनिर्माण योजना सुरु करणार
– वीज कंपन्यांचे ऑडिट करणार, विजेचे दर निम्म्याहून कमी करणार