त्यांना चिंता करू द्या, तुम्ही कामाला लागा-माजी खासदार पटोले

0
18

भंडारा,दि.24 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. मात्र केंद्र आणि राज्य शासन असंवैधानिक कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहे. जाहीरनाम्यातील कोणतीच वचने सरकार पूर्ण करू शकली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्वोच्च संविधान बदलविण्याची भाषा करणार्‍या आणि शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या सत्ताधार्‍यांनी जनतेची दिशाभूल केली असून ही सत्ता काय कामाची ? म्हणून आपण खासदारकीचा राजीनामा दिला. आता आपण कॉंग्रेसमध्ये येताच भाजपच्या पोटात दुखणे सुरु झाले असून त्यांना चिंता करू द्या, तुम्ही मात्र आता कामाला लागा, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले. ते जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा तसेच कार्यकर्ता मेळ्याव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसच्यावतीने माजी खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, लाखनीचे प.स. सभापती रविंद्र खोब्रागडे, उपसभापती घनश्याम देशमुख पवनीचे पं.स. सभापती बंडू ढेंगरे , उपसभापती मधू गभने यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, जिल्हा प्रभारी प्रफुल गुडधेपाटील, प्रदेश महासचिव मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, सभापती विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, युवराज वासनिक, सीमा भुरे आवेश पटेल, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमारे, प्रकाश पचारे, भंडारा नगर परिषदेचे गटनेता शमीम शेख उपस्थित होते. संचालन अजय गडकरी यांनी तर आभारप्रदर्शन अनिकजमा पटेल यांनी केले.
यावेळी रमेश डोंगरे म्हणाले, जिल्हा परिषदेत जनतेच्या कामांना प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे म्हणाले, कार्यकर्त्यांनी हेवेदावे व गटातटाचे राजकारण न करता एकजुटीने राहावे, असे आवाहन केले. यावेळी सेवक वाघाये, आनंदराव वंजारी, प्रफुल गुडधे पाटील, जिया पटेल, मुजीब पठाण, प्रमिला कुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुकुंद साखरकर, प्रशांत देशकर, अजय गडकरी, सचिन फाले, रोशन दहिकर, छोटू गणवीर, शाहीन मून यांनी सहकार्य केले.