माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते हे शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षात

0
10

पुणे,दि.17 : केंद्रीय राज्यमंत्री आणि दोन वेळा रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात केली. मोहिते यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
मोहिते हे शिवसेनेचे दोनदा खासदार होते. यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ करीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ते कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. परंतु क्षमता आणि पात्रता असूनही कॉंग्रेसमध्ये संधी दिली जात नसल्याचा खेद व्यक्‍त करीत त्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामप्रणित “भारतीय संग्राम परिषद’ या पक्षात प्रवेश केला होता. या नव्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
त्यानंतर मोहिते यांनी स्वाभिमानी पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीला बळ मिळेल, असा विश्‍वास खासदार शेट्टी यांनी व्यक्‍त केला. मोहिते म्हणाले, शेतकरी हा देशातील सर्वांत महत्त्चाचा घटक आहे. सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करीत आहेत. परंतु स्वाभिमानी पक्षाच्या राजकीय एजेंड्यावर शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.