मुफ्ती मोहंमद सईद मुख्यमंत्री तर निर्मल सिंग जम्मू काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री

0
14

जम्मू – पीडीपी आणि बीजेपीमध्ये दोन महिने चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर अखेर आज जम्मू-काश्मीरला नवे सरकार मिळाले आहे. मुफ्ती मोहमद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुफ्ती यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच भाजप सत्तेत सहभागी होणार आहे. दोन्ही पक्षांनी समन्वयाने सरकार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सईद 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्त्व करतील. त्यात उपमुख्यमंत्रीपदासह 12 भाजपचे आणि उर्वरित 12 पीडीपीचे मंत्री असतील. जम्मू यूनिव्हर्सिटीच्या जोरावर सिंह ऑडीटोरियममध्ये हा शपथविधी सोहळा होत आहे.
मंत्रिमंडळात यांचा समावेश
पीडीपीचे अब्दुल रहमान बट, जावेद मुस्तफा मीर, अब्दुल हक खान, सय्यद बशारत अहमद बुखारी, सईद मोहम्मद अलताफ बुखारी, गुलाम नबी लोन, हसीब द्राबू, चौधरी जुल्फिकार अली यांनी शपथ घेतली. तर भाजपच्या निर्मल सिंह यांच्या पाठोपाठ चंद्रप्रकाश, लाल सिंह, बाली भगत, सुखनंदन कुमार यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तसेच पिपल्स कॉन्फरन्सचे अब्दुल गनी लोन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

निवडणुकांचे निकाल
87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पीडीपीला 28 तर भाजपला 25 जागांवर विजय मिळाला होता. पीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि कांग्रेसला 12 तसेच 2 जागा सज्जाद लोन यांच्या पिपल्स कॉन्फरन्सला मिळाल्या होत्या.

कलम ३७० एफएसपीएसारखे मुद्दे बाजूला
भाजप व पीडीपीदरम्यान दोन मुद्द्यावर अजूनही चित्र स्पष्ट नाही. या मुद्द्यावर शुक्रवारी सईद यांना विचारले असता ते म्हणाले, हे मुद्दे राहू द्या, प्रत्यक्षात तो मुद्दाच नाही. आम्हाला हे सर्व करावे लागते. याबाबत आमचा दृष्टिकोन किमान समान कार्यक्रमातून स्पष्ट होईल.