राज्य शासनाने धान उत्पादकांचा विश्वासघात केला : नाना पटोले

0
13

भंडारा,दि.02 : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, धानपिकावर रोग आणि किडीच्या प्रादुर्भावासोबतच भारनियमन, वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस या प्रकाराने धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे प्राथमिक यादीत ठरविण्यात आले होते. पण अंतिम यादीत स्थान दिले गेले नसल्यामुळे धान उत्पादक विविध सोयींना मुकला असल्यामुळे राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप शेतकरी शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा धान उत्पादक जिल्हा म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. खरीप हंगाम २०१८ मध्ये मृग नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पेरणी करण्यात आली, पण पावसाने दडी मारल्याने रोप वाळली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवले. जिल्ह्यात राष्ट्रीय प्रकल्पासह मध्यम व लघू सिंचन प्रकल्प असले तरी कालव्यांची कामे पूर्णत्वास गेली नसल्याने अर्धापेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू असून पावसाच्या पाण्यावर धानशेती अवलंबून आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३७५ मिलीमीटर असले तरी चालू खरीप हंगामात १०५० मिलीमीटर पडल्याने २७ ते ३० टक्के पाऊस कमी झाला असे नाना पटोले यांचे म्हणणे आहे.

मामा तलावाच्या माध्यमातून काही प्रमाणात सिंचनाची सोय असली तरी गाळ न काढणे व अतिक्रमणामुळे तलावांचे आकारमान कमी झाले आहे. संबंधित विभागाने या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नादुरुस्त गेट व रपट्यातून पाण्याची व्यवस्था करून रोवणी पार पाडली. वातावरणातील बदलामुळे धान पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला.भारनियन व वन्य प्राण्यांमुळे धान पिकाची नासाडी तर परतीच्या पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी मेटकुटीस आला आहे. प्राथमिक यादीत काही तालुक्यांचे नाव असल्याने आशा पल्लवीत झाल्या असतानाच अंतिम यादीतून जिल्ह्यास दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनास धान उत्पादकांची परिस्थिती माहिती असताना शासनाच्या इशाऱ्यावर नाचल्याने दुष्काळग्रस्त यादीत स्थान दिले गेले नसल्यामुळे राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप शेतकरी शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून शेतकरी व शेतमजुरांच्या भरोश्यावर सत्ता सुंदरीचा उपभोग घेणाऱ्या शासनकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. .