बुथप्रमुखांच्या संवादात ओबीसी आरक्षणावर मोदींचे मौन!

0
12

गडचिरोली,दि.24ः-नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भाजपचे खासदार अशोक नेते यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. अन्य प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या मोदी यांनी आरक्षणाच्या या प्रश्नावर मौन बाळगले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भाजपचे खासदार अशोक नेते यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. अन्य प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या मोदी यांनी आरक्षणाच्या या प्रश्नावर मौन बाळगले. उपस्थितांना हे कटाक्षाने जाणवले. विविध समाजघटकाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मोदी यांनी ओबीसींच्याही आरक्षणावर सकारात्मक मत व्यक्त करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया उमटली.
गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे बुधवारी ही संवाद सभा झाली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री अंबरीश आत्राम, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, कृष्णा गजबे, रामदास आंबटकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी १२ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. साडेचार वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम बारामती व हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी ‘नमस्कार’ म्हणत मराठीतून संवाद साधला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे नाव घेतले. सर्वप्रथम खासदार अशोक नेते यांनी प्रश्न उपस्थित करताना, हा जिल्हा देशातील सर्वांत मागास, आदिवासीबहुल व माओवादग्रस्त आहे. रस्त्यांसाठी १२२४६ कोटी रुपये मिळाले असून सडक योजना, उज्ज्वला गॅस, आवास, सौभाग्य योजनांमुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे सांगितले. नागभिड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती द्यावी, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अशा प्रमुख दोन मागण्या केल्या. या दोन्ही प्रश्नांवर मोदी यांनी शेवटपर्यंत काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे सभा मंडपातील अनेक कार्यकर्ते उठून जायला निघाले. खासदार नेते कार्यकर्त्यांना विनंती करत होते. दिवसभर बसून केवळ पाच मिनिटात; तेही खासदार व एका कार्यकर्त्याशीच संवाद साधल्याने इतर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.