विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर

0
21

नागपूर,दि.16 – स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून, लोकजागरचे ज्ञानेश वाकुडकर वर्ध्यातून लढणार आहेत.
महामंचचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ही घोषणा केली. विदर्भातील उर्वरित चार लोकसभा मतदार संघाचे उमेदवार येत्या २० मार्च रोजी जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ निर्माण महामंचमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, जांबुवंतराव धोटे विचार मंच, विदर्भ माझा, प्रावॅटिस्ट ब्लॉक पार्टी आॅफ इंडिया, लोकजागर पार्टीसह विविध घटक पक्षांचा समावेश आहे.
पत्रपरिषदेला राम नेवले, श्रीकांत तराळ, आम आदमी पार्टीचे डॉ. देवेंद्र वानखेडे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, विदर्भ माझाचे मंगेश तेलंग, रमेश जनबंधू, राजेश बोरकर, सुनील चोखारे आदींसह ज्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली ते सर्व उमेदवार उपस्थित होते.संविधान वाचवण्यासाठी भाजपला हरवणे हेच पक्षाचे लक्ष्य असल्याचे आम आदमी पार्र्र्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले. भाजपला हरवण्यासाठी आप सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहे. जिथे सक्षम असून तिथेच उमेदवार उभा करू, असेही त्यांनी सांगितले.
हे आहेत विदर्भ निर्माण महामंचचे  उमेदवार

  • नागपूर – सुरेश माने
  • भंडारा- देवीदास लांजेवार
  • रामटेक-चंद्रभान रामटेके
  • चंद्रपूर -दशरथ मडावी
  • वर्धा – ज्ञानेश वाकुडकर
  • अमरावती -नरेंद्र कठाणे