अधिकृत पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने अपक्षाकंडे मतदारांचे लक्ष

0
14

गोंदिया,दि.२८ः– भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत किती उमेदवारी रिंगणात राहतील हे २८ मार्चला कळणार असले तरी सर्वसामान्य मतदार व नागरिकांता मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना घेऊन आजही मनात शंकेची पाल कुणकुणत असल्याचे चित्र आहे.त्यातही बहुतांश सर्वच मोठ्या भाजप,राष्ट्रवादी,बसपसह वंचित आघाडीचे उमेदवार हे एकट्या भंडारा जिल्ह्यातील असल्याने आणि गोंदिया जिल्ह्यातील एकही अधिकृत उमेदवार पक्षाचा नसल्याने रंगत वाढली आहे.त्यातच अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा खिळून बसल्या आहेत.राजकीय पक्षाचे नेते कितीही फरक पडत नसल्याचे सांगत असले तरी गेल्या दोनतीन दिवसापासून जो राजकीय दबाव तयार करण्यात येत आहे.त्यावरुन कुठेतरी अधिकृत पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार हे नक्कीच म्हणावे लागेल.

गोंदिया जिल्ह्यातून जे उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये भाजपचे माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांचा मुख्य समावेश आहे.बोपचे यांना 2014 मध्येच पक्षाने बाजुला सारले होते परंतु ओबीसी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम सुरु केल्याने त्यांचे राजकीय वजन राज्यपातळीवर पुन्हा वाढले तसेच ओबीसी आंदोलनात सहभाग असल्याने त्यांच्याकडे लोकांच्या नजरा आहेत. पत्रकार विरेंद्र जायस्वाल हे सुध्दा रिंगणात आहेत.जायस्वाल हे प्रत्येक निवडणुकीला उभे असतात. गेल्या वर्षभरापासून त्यांनी तयारी सुरु केली आहे.मायक्रोफायनास कंपन्याच्या विरोधात त्यांनी महिलांना एकत्र करुन एक शक्ती तयार झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. तर तिसरे अपक्ष उमेदवार हे भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व किसान गर्जेनेचे अध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले हे आहेत.पटले यांनी शेतकरी बेरोजगारासाठी काम केल्याचा उल्लेख केला जात आहे. अधिकृत भाजप,राष्ट्रवादी व बसपच्या उमेदवारांसोबतच अपक्ष कायम असलेले डॉ.खुशाल बोपचे यांचे पारडे अपक्ष उमेदवारामध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश मतदार व सर्वसामान्य नागरिकांसोबतच नोकरदारव वर्गही डॉ.बोपचेंच्या उमेदवारीकडे लक्ष लावून बसला आहे.डॉ.बोपचे कायम राहतात की आपला अर्ज मागे घेतात या चर्चांनाही गोंदिया जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सुरवात झाली आहे.सोबतच पोवार समाजातील ते मान्यवर असल्याने समाजामध्ये सुध्दा त्यांच्याप्रती एक आपुलकी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.फक्त ते रिंगणात कायम राहतात की काय यावर अवलंबून राहणार आहे.भाजपच्याच काही मतदार कार्यकत्र्यांच्या चर्चेनुसार बोपचे हे रिंगणात राहिले तर गोंदिया जिल्ह्यातील एकमेव मोठे उमेदवार असल्याने आणि त्यांना मतदारसंघातील जनतेचा व समस्यांची जाणिव असल्याने अखेरच्या क्षणी भाजप,राष्ट्रवादी विरुध्द डॉ.बोपचे अशी लढत होऊ शकते असे बोलले जात आहे.त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार डॉ.विजया नांदुरकर या महिला उमेदवार असल्याने त्या सुध्दा यावेळी निवडणुकीत रंगत निर्माण करु शकतात असेही चर्चा आहेत.मात्र जोपर्यंत अधिकृत उमेदवार रिंगणात कोण आहेत हे स्पष्ट होत नाही,तोपर्यंत तरी निवडणुकीतील चुरसीची स्पष्टता करता येणार नसली तरी गोंदिया जिल्ह्यातील अधिकृत उमेदवार एकाही पक्षाचा नसल्याने त्याबद्दलची नाराजी व्यक्त होतांना सर्वच राजकीय पक्षासोबत सर्वसामान्यातही आहे.