विकास करण्याऐवजी शहराचा बट्याबोळ केला -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण

0
17

औरंगाबाद : ­ महानगरपालिकेत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपने शहराचा कोणताही विकास केला नाही. त्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी शहराचा पूर्णपणे बट्याबोळ केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरासमोर विकासाचे अनेक प्रश्न असताना महापालिकेतील सत्ताधा-यांनी केवळ धार्मिकतेच्या नावावर शहरवासीयांना विकासापासून कोसोदूर ठेवले आहे. शहराचा विकास करावयाचा असेल, तर शहरवासीयांनी काँग्रेस पक्षाला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात होणा-या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी केंद्र व राज्यातील आघाडी सरकारने मनपाला मोठा निधी दिला होता. निधी देऊन ७ वर्षे उलटून गेले, तरी समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर असतानादेखील पालिकेतील सत्ताधारी स्वत:चे आर्थिक हित पाहत असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असेही ते म्हणाले. राज्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या गोवंशबंदी कायद्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतक-यांना जनावरांचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत गोरगरीब शेतकरी आपल्या जवळील जनावरे विकून आपला चरितार्थ चालवितो मात्र, गोवंश हत्याबंदीमुळे ते अडचणीत आले.