शिवसेनेला धक्का: माजी आमदार अशोक काळे राष्ट्रवादीत

0
10

अहमदनगर- कोपरगावचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते अशोक काळे यांनी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अशोक काळे यांची रविवारीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशोक काळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पक्षनेतृत्त्व आत्मकेंद्रित झाले आहे व त्यांना आमच्यासाठी वेळ नाही अशा शब्दात काळे यांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, आघाडी सरकारच्या काळात तालुक्यातील पाणीप्रश्न चिघळला. युतीचे सरकार सत्तेवर आले तर कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान न्याय मिळेल अशी आशा होती. पण ‘पायथा ते माथा’ धोरण जाहीर करून त्यांनी आमचा प्रचंड अपेक्षाभंग केला आहे. त्याची दखल घेण्यास पक्षनेतृत्व तयार नाही. माझ्यासाठी तालुक्याचा पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. पाणी टिकले तरच इथला शेतकरी टिकेल, मग तो काळे कारखान्याचा सभासद असो वा संजीवनीचा, तालुक्यातील सर्वसामान्य जनता हेच माझे कुटुंब आहे. त्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न गेली दहा वर्षे मी एकटा लढलो. इतकी वर्षे पाणीप्रश्नी संघर्ष केल्यानंतरही त्यांच्याकडून उपेक्षा होत असेल तर त्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊन संघर्ष केलेला बरा, अशा शब्दांत माजी आमदार अशोक काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे समर्थन केले होते.