औरंगाबादमध्ये शिवसेना ६४, तर भाजप लढविणार ४९ जागा

0
10

मुंबई – शिवसेना-भाजप युतीचे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत संकेत मुंबईतून मिळाले असून एकूण ११३ जागांपैकी ६४ शिवसेना, तर ४९ जागा भाजप लढविणार असल्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची औरंगाबादेत बैठक करून झाली आहे.

औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा मुंबईत अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत ६४-४९ चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज दोन्ही पक्षांचे नेते संयुक्तपणे याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही समजते.

दरम्यान औरंगाबादेत स्थानिक पदाधिकार्‍यांच्या बैठकीतही हा फॉर्म्युला मान्य झाल्याचे कळते. गेल्या निवडणुकीत ९९ पैकी शिवसेनेने ५९ तर ४० जागा भाजपने लढवल्या होत्या. मात्र राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने यंदा ११ वाढीव जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.