25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय भाजपने शिवसेनेला संपविण्याची सुपारी घेतली आहे काय? -भोंडेकर

भाजपने शिवसेनेला संपविण्याची सुपारी घेतली आहे काय? -भोंडेकर

0
24

भंडारा,दि.26ः- केंद्रात व राज्यात भाजप-सेनेची युती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा युतीचे संकेत मुख्यमंत्र्यांकडून मिळत असले तरी भंडारा जिल्ह्यात भाजपकडून शिवसेनेला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे.सोबतच जिल्ह्यातून शिवसेना संपवण्याची सुपारीच भाजपच्या नेत्यांनी घेतल्यासारखे चित्र असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत युती झाली आणि जिल्ह्यातील एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास भाजपविरोधात खुला प्रचार करू, अशी जाहीर भूमिका भंडार्‍याचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
शनिवारी भंडारा येथे महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते झाले. परंतु, या भूमिपूजनासाठी शिवसेनेला विश्‍वासात घेण्यात आले नाही, असे सांगत भोंडेकर म्हणाले की, राज्यात आरोग्य मंत्री शिवसेनेचा असताना त्यांना विश्‍वासात न घेता भूमिपूजनाचा घाट रचण्यात आला. शासकीय शिरस्त्यानुसार महिला रुग्णालयाचे भूमिपूजन आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते होणे अपेक्षित होते. मात्र, जाणीवपूर्वक त्यांना डावलून भूमिपूजन उरकण्यात आल्याने दोषी असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही अधिकार्‍यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष असला तरी भाजपचे स्थानिक पदाधिकारी कधीही शिवसेनेला आपला मित्र मानत नाही. महिला रुग्णालयासाठी सर्वाधिक आंदोलने शिवसेनेने केली. मात्र श्रेय भाजपने घेतला. हा कुठला युतीधर्म? भाजपने शिवसेनेला संपविण्याची सुपारी घेतली आहे काय? असा प्रश्न नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केला.
येत्या विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही तर भाजपच्या उमेदवाराविरुद्ध उघड प्रचार करू, शिवसेना पक्षप्रमुखांनी आमच्यावर कारवाई केली तरी बेहत्तर, अशी स्पष्ट भूमिका नरेंद्र भोंडेकर यांनी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभेसाठी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक मुंबई येथे बोलविली आहे. या बैठकीत जागा वाटप व निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. भाजपकडून सेनेला मिळत असलेली सापत्न वागणुकीबाबतही उद्धव ठाकरे यांना अवगत केले जाईल, अशी माहिती नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी दिली.

blank