नवी मुंबईत राष्ट्रवादी,औरंगाबादमध्ये महायुतीला अपक्षांच्या कुबड्या

0
34

मुंबई – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. नवी मुंबईत सर्वाधिक ५२ जागा मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसह अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेत महायुतीला सर्वाधिक ५१ जागा मिळविण्यात यश आले असले तरी बहुमतापासून महायुती दूर आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत एमआयएमने सर्वांचं लक्ष वेधत २५ जागांवर विजय मिळवित विरोधी पक्षाची जागा काबिज केले आहे.नवी मुंबईच्या महापालिकेवर मागील 20 वर्षांपासून गणेश नाईकांची एकाहाती सत्ता आहे. त्यामुळे नाईक यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळते की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

काही जनमत चाचणीत नवी मुंबईकरांनी पुन्हा सत्तेचा सोपान नाईक यांच्या हाती सोपविल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेत यावेळी त्रिशंकू स्थिती असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत नोंदवले होते.
औरंगाबादकरांनी सलग सहाव्यांदा शिवसेना-भाजप युतीला कौल दिला आहे. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये एमआयएमने घवघवीत यश मिळवले. औरंगाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नसून, प्रथमच महापालिकेची निवडणूक लढवणा-या एमआयएमकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार आहे.औरंगाबादमध्ये शिवसेनेला सत्ता कायम राखण्यात यश मिळाले असले तरी, शिवसेनेला दोन मोठे फटके बसले आहेत. औरंगाबादच्या शिवसेनेच्या महापौर कला ओझा पराभूत झाल्या आहेत. तसेच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे गुलमंडी प्रभागातून पराभूत झाला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी गुलमंडी प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. इथून अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांचा विजय झाला. फक्त ८९ मतांनी तनवाणी विजयी झाले. तनवाणी यांच्या विजयानंतर गुलमंडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.