गोवंश हत्याबंदीविरुद्ध १९ मे पासून आंदोलन

0
9

गोंदिया,दि.4-:भाजप-शिवसेना कायद्याला न जुमानता गोवंश हत्याबंदी कायदा आणत आहे. तसा मसुदा राज्यपालांकडे पाठवण्यात आला. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १९ मे रोजी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ते गोंदियात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्य शासन आणू पाहत असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे सुमारे २५ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. अनेक उद्योग बंद पडतील. शेतकरी आपल्याकडील मरणाला टेकलेला बैल देखील विकू शकणार नाही. गाईच्या हत्येवर बंदी आणण्याकरता आमचा विरोध नाही. परंतु राज्य शासनाचा गोवंशहत्या बंदीचा निर्णय चुकीचा आहे. त्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे, आठवले यांनी जाहीर केले. महाराष्ट्र निर्मितीपासून आतापर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही. राज्य सरकार आजही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भाचा अनुशेष कायम आहे. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचा असूनही उपयोग होईनासा झाला आहे, असे आठवले यांनी नमूद केले. बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहत आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून नावारूपास आणण्याचा यापूर्वीच्या सरकारचा मानस होता. परंतु तो पूर्ण झाला नाही. या वसाहतीचा विकास विद्यमान सरकारने करावा. अतिक्रमित पट्ट्यांनी अट शिथिल करून शासनाने २०१० पर्यंत ज्यांचे अतिक्रमण आहे, अशांना देखील पट्टे शासनाने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.