शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा विचार-मुख्यमंत्री

0
11

नागपूर दि.4: ‘शेतकऱ्यांना​ दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीचे परिपत्रक काढून मागे घेण्यात आले होते. मदतीसंदर्भात केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. या निकषाचा अभ्यास करून, लवकरच वाढीव मदत देण्यात येईल’, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. रामगिरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री नुकतेच इस्रायल दौऱ्याहून परतले आहेत. त्यांनी या दौऱ्यात शेतीसाठी आवश्यक काही करार केले आहेत. यानुसार राज्यातील उस्मानाबाद आणि यवतमाळ येथे इस्रायल सरकार व शिमॉन पेरेझ फाउंडेशनतर्फे पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात येणार आहे. शेतीसंबंधीचे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यापेक्षा संसाधनाचा योग्य वापर व्हावा. याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, हा यामागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी​ स्पष्ट केले. चंद्रपुरातील खाण कर्नाटकला देण्यावरून सध्या भाजप व सेनेत वादाचा सूर आहे. त्यावर खुलासा करीत आघाडीच्या काळात ही खाण देण्यात आल्याचे सांगत त्याला दोन वर्षाहून अधिक काळ झाल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या खाणीवरून वाद निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उलटपक्षी, छत्तीसगडमध्ये महाराष्ट्र सरकारला एक खाण देण्यात आली असून, त्यातून पुढील ४० वर्षे चांगल्या दर्जाचा कोळसा उपलब्ध होईल. ज्यामुळे महानिर्मितीकडून उत्पादित करण्यात येणारी वीज कमी दरात मिळेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.